June 1, 2025

दहिवलीमध्ये पर्यटकाचा खून; किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला

लोणावळा (ता. २७): दहिवली गावात पर्यटकांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आणि यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला असून, या घटनेत दोन पर्यटक जखमी झाले आहेत.

मृत व्यक्तीचे नाव संजय भद्रावले (रा. टिळकनगर, गुहागर) असे असून तो आपल्या पाच मित्रांसह लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आला होता. काही स्थानिक तरुणांशी किरकोळ कारणावरून झालेला वाद नंतर मोठ्या झगड्यात रूपांतरित झाला.

झगड्यादरम्यान धारधार शस्त्राने संजय याच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे दोन मित्रही जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.