नाशिक: लासलगाव परिसरात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात मोटारसायकल, दागिने आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण देवाणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रशांत देवनाथ गणे (वय २४, रा. मंगळग्रह मंदिराजवळ, वडाळी, नाशिक) असे आहे.
तपासादरम्यान आरोपीने लासलगाव परिसरातील विविध ठिकाणी घडवलेल्या चोरीच्या घटना कबूल केल्या. त्याने वापरलेल्या वाहनाचा वापर करून गुन्हे केल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐवज जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक प्रवीण देवाणे यांच्यासह डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक सुनील पगारे, युनूस पठाण, शेख जावेद, दिलीप बोडके, शेलके, महाजन, तुकाराम, सागर शिंदे आणि इतर पथकाच्या सदस्यांचा मोलाचा सहभाग होता.
